कडेगाव (प्रतिनिधी)
महावितरणकडून वारंवार होणाऱ्या त्रासाला शेतकरी कंटाळून गेला आहे. शेतकऱ्यांनी बऱ्याच नेत्यांकडे याविषयी गाऱ्हाणी मांडली पण दाद मात्र मिळत नव्हती. यामध्ये सामंज्यस्याची भूमिका घेऊन तोडगा काढणे गरजेचे होते. शेतकऱ्यांना दिलासादायक बातमी असून कडेगांव - पलूस तालुक्यातील शेतकऱ्यांना विज पंपाची वीज अखंडपणे ८ तास मिळणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी बुधवारी दिली .
कडेगांव व पलूस तालुक्याला शेती पंपाची वीज दिवसाला आठ तास दिली पाहिजे. तालुक्यात सिंचनाखालील क्षेत्र वाढले आहे. मात्र त्या तुलनेत वीज वितरण कंपनीचे तालुक्यात इन्फ्रास्टक्चर नाही. शेतीला पुरेशी वीज मिळण्यासाठी आवश्यक यंत्रणा उभी केली पाहिजे, अशी मागणी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष तथा जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष संग्राम देशमुख यांनी केली आहे. याबाबत देशमुख यांनी बुधवारी वीज वितरणचे विटा विभागीय कार्यकारी अभियंता विनायक इदाते यांची शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह भेट घेऊन चर्चा केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्राम देशमुख यांनी कार्यकारी अभियंता इदाते यांना वीज वितरणची कडेगाव तालुक्यातील परिस्थिती निदर्शनास आणून दिली. आपण जिल्हा परिषद अध्यक्ष असताना जिल्हा नियोजन मंडळातून ट्रान्स्फार्मर बसवण्यासाठी कोट्यवधींचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यातील कामे अद्याप सुरू आहेत. तालुक्यात सिंचन योजनांचे पाणी आल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बागायत शेती केली आहे. मात्र तालुक्याला केवळ चार तास शेतीची वीज मिळत असल्याने शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. शिवाय तेवढ्या चार तासात सर्वच शेतकरी पाण्यासाठी वीज सुरू करीत असल्याने डीपीवर ताण येत असतो. ओव्हरलोड झाल्याने ट्रान्स्फार्मर जळण्याचे प्रमाण वाढले आहे. प्रसंगी आम्ही स्वतः पालकमंत्री जयंतराव पाटील साहेब यांना भेटून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मार्ग काढण्यासाठी मागणी करणार आहोत, असेही देशमुख यांनी सांगितले.
यावेळी संदेश दंडवते, सुधाकर चव्हाणवसंतराव शिंदे, संभाजी रासकर, प्रकाश गायकवाड, अरूण हावलदार, बबन माळी, सुधाकर शेटे, हणमंत चव्हाण, मनोज माळी, प्रविण सुर्यवंशी यांच्यासह शेतकरी, भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
0 Comments