रविवारी सागरेश्वरमध्ये पुरस्कार वितरण : 'आपली शिदोरी - आपले संमेलन'चे आयोजन
देवराष्ट्रे (वार्ताहर)
सागरेश्वर अभयारण्याचे जनक, वृक्षमित्र कै. धों. म. मोहिते यांच्या स्मृतिदिनानिमित्त दिला जाणारा वृक्षमित्र धों. म. मोहिते 'पर्यावरण पत्रकार पुरस्कार' सातारा येथील पत्रकार शैलेंद्र पाटील यांना तर कवीवर्य चंद्रकांत देशमुखे 'पर्यावरण स्नेही पुरस्कार' पर्यावरण चळवळीतील अजित उर्फ पापा पाटील ( सांगली ) यांना जाहिर झाला आहे . रविवार दि. १२ रोजी सागरेश्वर अभयारण्यात होणाऱ्या 'आपली शिदोरी - आपले संमेलन' या कार्यक्रमात पुरस्काराचे वितरण होणार आहे, अशी माहिती धर्मेंद्र पवार व रानकवी सु. धों. मोहिते यांनी दिली.
वृक्षमित्र धों. म. मोहिते चॅरिटेबल ट्रस्ट, खानापूर - कडेगाव तालुका मराठी साहित्य परिषद व अमृतवेल ग्रामविकास प्रबोधिनी यांच्यावतीने कै . धों. म. आण्णांच्या स्मृतिप्रितर्थ पर्यावरण क्षेत्रात काम करणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात. पर्यावरण पत्रकारितेसाठीचा यंदाचा पुरस्कार सातारा येथील पत्रकार शैलेंद्र पाटील यांना दिला जाणार आहे . तर पहिलाच कविवर्य चंद्रकांत देशमुखे पर्यावरण स्नेही पुरस्कार सांगलीचे पर्यावरण व वन्यजीव अभ्यासक अजित उर्फ पापा पाटील यांना जाहीर झाला आहे.
अजित पाटील हे गेली अनेक वर्षे पर्यावरण व वन्यजीवांचे संशोधनात्मक काम करीत आहेत. त्यांचा चांदोली अभयारण्य निर्मिती पूर्वी व नंतर सर्वेक्षण , संशोधात्मक सहभाग राहिला आहे. रिव्हर व्हॅली एक्सपिडेशन संशोधन सोसायटीमार्फत येल्लापूर (कर्नाटक) येथे खग्रास सूर्यग्रहणाचा वनस्पती व प्राणीमात्रांवर होणारा परिणाम याचा अभ्यास त्यांनी केलेला आहे. सायलेंट व्हॅली (केरळ) येथील जंगल संशोधन तसेच वनस्पती,प्राणी, नदी,इतिहास, भूगोल, सामाजिक व आर्थिक या विषयी अभ्यास दौरा व संशोधनात्मक काम राहिले आहे. पश्चिम घाट बचाव मोहीम , चिपको आंदोलनात सहभाग तसेच नॅशनल जीओग्राफीक सोसायटी , बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी , मुंबई ,महाराष्ट्र अँथॉलॉजीकल सोसायटी , पुणे अशा विविध संस्थांच्या माध्यमातून त्यांचे पर्यावरण क्षेत्रासाठी मोठे योगदान राहिले आहे.
शैलेंद्र पाटील हे गेली २० वर्षे पत्रकारिता क्षेत्रात आहेत. ईटिव्ही भारत व पीटीआय वृत्त संस्थेसाठी सातारा जिल्हा प्रतिनिधी म्हणून काम करीत आहेत. दिल्लीच्या सेंटर फाॅर सायन्स ऍण्ड एन्व्हायरमेंट या संस्थेची 'जागतिक निसर्ग वारसा स्थळाजवळील पर्यावरणस्नेही शहरे व तेथील बांधकाम' या विषयावरची फेलोशिप त्यांना २०१४ मध्ये मिळाली आहे. अजिंक्यतारा किल्ल्याचा लोकसहभागातून विकास ,
हरित इमारतींना घरपट्टीत सवलत मिळण्यासाठी सातारा पालिकेकडे पाठपुरावा, पर्यावरणपुरक मुर्ती विसर्जन, लोकसहभागातून कास तलाव परिसर स्वच्छता मोहिम व प्लास्टिक कचरा निर्मूलन यामध्ये योगदान, ड्रोंगो संस्था व पत्रकारितेच्या माध्यमातून काॅसमाॅस वनस्पती निर्मूलनासाठी जागृतीपर उपक्रम ,मायणी समुह पक्षी संवर्धन तसेच वाई तालुक्यातील जोर -जांभळी संवर्धन राखीवसाठी पाठपुरावा त्यांनी केला आहे.पाटील हे 'ड्रोंगो' या पर्यावरण रक्षण-संवर्धन संस्थेचे ते सचिव म्हणून कार्यरत आहेत.त्यांनी पत्रकारितेतून वेळोवेळी पर्यावरण विषयांवर विपुल लेखन केले आहे.
पर्यावरणक्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन धर्मेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली दीपक पवार , दत्तात्रय सपकाळ , रविकुमार मगदूम यांच्या निवड समितीने यंदाच्या पुरस्कारासाठी शैलेंद्र पाटील व अजित पाटील यांची नावे निश्चित केली आहेत . रविवार दि. १२ रोजी सकाळी १० वाजता सागरेश्वर अभयारण्यात होणाऱ्या 'आपली शिदोरी - आपले संमेलन' कार्यक्रमात मान्यवरांच्या उपस्थितीत पुरस्कार वितरण होणार असल्याचे पवार, मोहिते यांनी सांगितले.
0 Comments